गुहर होने तक _गणेश धामोडकर




गालिबची “ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता,” ही गझल बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. त्या गझलेचा हा मक्ता:

ये मसाईले तसव्वुफ ये तेरा बयान गालिब,
हम तुझे वली समझते जो न बादाख्वार होता

ह्या तुझ्या अध्यात्माच्या गोष्टी, ही तुझी प्रवचनं गालिब – आम्ही तुला संत समजून बसलो असतो, तितका तू दारूडा नसता तर.. हे दारुडेपण अंगात असणं मोठी भाग्याची गोष्ट, अगदी संत होण्यापेक्षाही महत्त्वाची! प्रत्येकालाच कुठे दारूडं होता येतं? किंवा प्रत्येकच जण आपापल्या परीनं थोडाफार दारूडा असत असावा. कुणाला कळतं, कुणाला कळत नाही! तर गालिबला हे त्याचं दारूडेपण पुरतं ठाऊक होतं अन् त्याला त्याचं महत्त्वही कळत होतं, सगळ्यांनाच कुठे तसं दारूडं होता येतं?

खलिल जिब्रानच्या प्रोफेटमधलं एक वाक्य आठवलं.  प्रेमाबद्दल बोलतांना जिब्रान म्हणतो:  Love crowns you so shall it crucify you.  पहिल्यांदाच वाचतांना अंगावर असा काटा आला होता.  ह्म्म, प्रेम जर तुमच्या डोक्यावर मुकुट चढवत आहे, तर ते तुम्हाला crucify करण्यासाठीच आहे याची जाणिव असायला हवी, अन् crucify होण्याची तयारीही असायला हवी. प्रत्येकालाच कुठे crucify व्हायची संधी मिळते? युगायुगांतून एखाद्याच्या डोक्यावर प्रेम असा मुकुट ठेवतं.. युगायुगांतून एखादा असा दारूडा जन्माला येतो.  दारूची लत लागावी तशी प्रीतीची लत लागावी लागते.  कैलाश खेरच्या अंदाजात सांगायचं तर “तेरी दीवानी” व्हायची तयारी असावी लागते, तयारी म्हणण्यापेक्षा तशी दीवानी (दीवानासुद्धा नाही, तुमच्यातल्या पुरुषी अहंकाराची ऐशीतैशी करून) – अगदी दीवानी होण्याची लत लागावी लागते, तेव्हा कुठे हा दारूडेपणाचा ताज डोक्यावर घ्यायची पात्रता हृदयात निर्माण होते.  जिब्रानच्या याच लेखातलं आणखी एक वाक्य आठवतंयः  Love directs your course if it founds you worthy.  यातलं “if it founds you worthy” हे महत्त्वाचं!

चला, विषयांतर बरंच झालं.  पण सध्या असं झालंय की गेल्या तीनचार वर्षात मी एक शब्द धड लिहिला नाहिये, त्यामुळे आता लिहायला बसलोच तर अरेबियन नाईट्ससारखं गोष्टीमधून गोष्ट निघत मी किमान हजार रात्री तरी लिहत बसू शकतो.  ह्म्म, परत विषयांतर… आता मुळ मुद्याकडे जायलाच हवं – गुहर होने तक..

कालच म्हटल्याप्रमाणे “आह को चाहिये एक उम्र असर होने तक” या गझलेतला हा शेर:

दामे हर मौज में है हल्का ए सदकाम ए निहंग
देखें क्या गुजरे है कतरे पे गुहर होने तक

प्रत्येकच लाटेच्या अंतरंगात शेकडो मगरी आ वासून बसल्यायत, बघुया मोती होईपर्यंत आता या थेंबाचं कायकाय होतंय ते! तो स्वातीच्या पावसाचा एक थेंब, अन् त्याचं ते शेकडो मगरींच्या जबड्यातून शिंपल्याची आस धरून जाणं - पण मला हा शेर आवडतो तो त्यातल्या “गुहर होने तक” यामुळे.. हो, तो बिचारा (?) एक स्वातीचा एकटा थेंब अन् त्याचं ते इतक्या संकटांमध्ये पडणं, कायकाय गुजरणार आहे त्याच्यावर त्याचं तोच जाणे, पर शेवटी “गुहर होने तक” हा आशावाद, नव्हे खात्री, तीच त्या थेंबाला सगळ्या संकटांमधून घेऊन जाणार आहे. हे सगळं सहन करायच आहे, पण कधीपर्यंत? तर गुहर होईपर्यंतच.. या गुहर होनेतक ला “शायद”ची कटकट नाही; शेवटी गुहर व्हायचंच आहे…

तर असं हे ब्लॉगचं नाव निघालं… गुहर होने तक.. सध्या एक थेंबच आहे, जातोय मगरींच्या विळख्यातून, मनात “गुहर होने तक” ची धून घेऊन...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा