सदानंद डबीरांच्या गजलेचा मागोवा ‘काळिजगुंफा’च्या अनुषंगाने _डॉ राम पंडित

                                               


स्व. सुरेश भटांनी 1963 पासुन गजला लिहिण्यास सुरुवात केली. गजलला मराठी भाषा व संस्कृतीचा चेहरा दिला. दुर्बोधतेकडे झुकलेल्या तत्कालीन मराठी कवितेला कंटाळलेल्या रसिकमान्य वर्गाला प्रसादगुणयुक्त, मोहक तरलता ल्यालेली भटांची गजल भावली. या गजलेचे श्रोते व वाचकांशी भाव-साहचर्य वाढत गेले. अल्पकालावधीत गजलेस जनस्वीकृती मिळाली अन्‌ अनेक तरुण कवी व काही अकवी गजल-सृजनाकडे आकृष्ट झाले. मुलत: कवी असलेले मोजकेच जण तंत्र अवगत करून गजल रचना करू लागले. यास भट संप्रदाय असे संबोधण्यात येऊ लागले. मराठीत गजल-सृजनास चळवळीचे स्वरूप आले. बव्हंश कवींवर भटशैलीचा प्रभाव अनुकरण सीमेपर्यंत होता. त्यांचाही नाइलाज होता कारण त्या सार्‍यांसमोर रोल मॉडेल भटच होते. हळूहळू या बाजारगर्दीतून हातांच्या बोटांवर मोजता येईल इतकेच जण बाहेर पडले व त्यांनी आपल्या गजलची स्वतंत्र ओळख स्थापित केली. यातील एक अग्रगण्य नाव सदानंद डबीर होय.
‘लेहरा’, ‘तिने दिलेले फूल’, ‘खयाल’, ‘आनदं भैरवी‘ अन्‌ ‘काळिजगुंफा’ या पाच काव्यसंग्रहातील पहिल्या दोन संग्रहांत कवितागीतांचे प्रमाण अधिक आहे. लेहरा संग्रहातील गजलांवर भटांच्या शैलीची झाक अवश्य आहे. पण पुढे डबीरांच्या गजलानी वेगळे वळण घेतले अन्‌ आपली स्वतंत्र शैली निर्माण करणार्‍या निवडक गजलकारांत त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. ‘खयाल’ व ‘काळिजगुंफा’ हे प्राधान्याने गजलसंग्रहच आहेत.
डबीरांची गजल भटांच्या प्रभावातून पूर्णपणे बाहेर पडली आहेच, पण समकालीन कवींपेक्षा त्यांची अभिव्यक्ती पृथक आहे, हे खालील शेर बघता सहजच जाणवेल.

काळिजगुंफेमधला वारा जरा हालला बहुधा
मनात माझ्या तुझा चेहरा जरा तरळला बहुधा
---
भ्रमनिरास होतो तेव्हा, ते ज्याचे त्याला कळले
आवाज न करता काही, हृदयातील घर कोसळले

खरे तर गजल ही विधा पद्य वाङमयाचा एक प्रकार आहे. तिला सूत्रबद्घ कवितांची छंदोबद्घ माळ म्हणणे उचित ठरेल. गजलेत कवितेची आशयघनता व गीतांची कर्णमधूरता अंगभूत असणे अपेक्षित आहे. शेरातील काव्य ज्या विशिष्ट पद्घतीने गजल व्यक्त करते ती अभिव्यक्ती-शैलीच गजलेला कविता व गीतांपासून पृथक करते. फरक फक्त अभिव्यक्तीचा, सादरीकरणाचा आहे. अन्यथा गजल हे शृंखला-पद्यच आहे.
डबीरांच्या गजलेत ‘खयाल’ या संग्रहापासून अलगदपणे शैलीत परिवर्तन घडत गेले. त्यांची गजल उत्तरोत्तर गंभीर, चिंतनात्मक व जीवनविषयक प्रश्नांचा मागोवा घेणारी होत गेली आहे. आता ती काही वर्गाला कवितेच्या जवळ जाणारी वाटेलही, कारण कवितेच्या व गजलेच्या सीमारेषा आधुनिक गजलेतही पुसट होत आहेत. उर्दूतील म. अलवी, बानी, कुमार पाशी, आदिल मंसूरी यांपासून म्हणजे जवळपास 1980 पासूनच ही प्रक्रिया प्रारंभ झाली होती. नवीन उर्दू शायरांनी ती पूर्ण करीत आणली आहे. तर मराठीत डबीरांनी ह्या शैलीचा प्रारंभ केला आहे असे म्हणता येईल.


असे बरेचसे शेर जीवनाच्या वास्तवाचे तरल, संक्षिप्त वर्णन करतात तेव्हा ती डबीरीय गजल-शैली आहे हे लक्षात येते.
गजलेत शब्द व गजलकारास अभिप्रेत असलेला आशय यांचा भावबंध अत्यंत महत्वाचा असतो कारण छंदनिर्वाहासाठी अनेकदा शब्दांबाबत तडजोड करावी लागले अन्‌ शब्द आशयाशी प्रतारणा करतात. म्हणून डबीरांनी गजलच्या शेरांची संख्या अकारण वाढविण्याचे कटाक्षाने टाळले. काही गजला तर चारच शेरांच्या ठेवल्या. एवढेच नव्हे तर सभोवती गजल सृजनाचे उदंड पीक येत असतानाही त्यांना गजलच्या बहुप्रसवतेची लागण झाली नाही, ही स्पृहणीय बाब होय.

भणंग माझे जिणे असे दे, व्यथा असू दे
या फकिराच्या ओठांवर पण, दुआ असू दे

या पसायदानस्वरूप गजलेत स्वरकाफिया (था व आ) वापर आहे. या गजलेत त्यामुळे अनेक शेर गुंफणे सहज शक्य होते. पण केवळ सहा शेरांतच ही गजल परिपूर्ण झाली आहे. म्हणजे यमकानुगामी गजल रचण्याकडे डबीरांचा कल नाही, हेच दिसून येते.
सूत्र ग्रंथ व भाष्य ग्रंथ यांच्यात ते साधर्म्य-वैधर्म्य आहे तेच कविता व गजल यांमध्ये आहे. गजल सूक्तिसंग्रहासारख तर त्यातील एकेक सूक्तीची कैफियत कवितेत असते. गजलेत कवितेप्रमाणे महाकाव्य संभवत नाही. गजलेच्या बाह्य व आंतर संरचनेत मर्यादा आहेत. एखादा मोठा विचार कवितेत सहजपणे शब्दबद्घ करता येतो. मात्र गजलेत तो सूत्ररूपानेच मांडता येतो. ही तिची अंगभूत अपरिहार्यता आहे. पण ही सूत्ररूपशैली जेव्हा कलात्मकरित्या पेश होते तेव्हा सौंदर्यानुभव देते व वाचक श्रोत्यांच्या मन-बुद्घीत अंकित होते. असेच काही शेर डबीरांनी लिहिले आहेत ते नमुद करण्याचा मोह आवरत नाही -

सांजयात्रेला निघाल्या लांबणार्‍या सावल्या
थांबलेल्या माणसांच्या हालणार्‍या सावल्या
---
अंधुक अंधुक किती चेहरे स्मरणातून ओघळली
धुक्यात गुरफटलेली झाडे, तशी माणसे दिसती
---
झाकलेले दु:ख माझे आज बाजारात आले
बघ तुझ्या दुनियेत माझे नाव रातोरात झाले

मध्यंतरी मराठी गजलेत काही कवींच्या शेरांत तुच्छतावाद, अहंभाव, आत्मप्रौढीचभाव नको तितक्या प्रमाणात दाखल झाला होता. विशेष म्हणजे सुखासीन जीवन जगणार्‍या कवींच्या गजलांत हा भाव आल्याने गजल कृतक भासू लागली हे सहजस्फूर्त काव्य नव्हे याची जाण वाचक/श्रोते यांना असू शकते, हे या कवींना कळत नसावे. अशात डबीर व त्यांचे काही समकालीन, सकारात्मक प्रत्यय देणारे शेर लिहू लागले, तेव्हा गजलेत शैली परिवर्तनाची चाहूल लागली.

सूर नाही, साज नाही गीत हे आहे कसे?
हे कसे एकांत माझे गुणगुणाया लागले !
---
येणारा प्रत्येकच क्षण नवीन
जगणे हे रोजचेच-पण नवीन!
---
मी तुझ्यासाठीच होते एक गाणे गायिले
अजुन फांदीवर स्वरांचे पाखरू ते थांबले !

ही तरल शैली संवेदनशील कविता अन्‌ गीतांचा समन्वय साधणारी आहे.
डबीरांना मुशायर्‍याची दादलेचा गजल व वैचारिक अधिष्ठान असलेली चिंतनशील गजल अशा दोन्ही शैलीत गजल रचण्याची किमया साधलेली आहे. विरोधाभास व चमत्कृती, नाट्यमयता हे मुशायर्‍याच्या गजलेचे वैशिष्ट्य गणले जाते. (वाङमयीन जाण असलेले श्रोते असले तर चिंतनशील शेरदेखील दाद घेतात.) दादलेवा शेर बहुधा हजल अंगाने जातात व साधारणत: तत्कालीन घटनेवर भाष्य करतात, डबीरांचे हे दोन शेर बघा-

कोण जाणे कोणता हा देश आहे
कावळ्यांना पांढरा गणवेश आहे!
---
कोळशाची खाण आहे हात काळे व्हायचे
काय मंत्र्यांनी लगेचच, राजीनामे द्यायचे?

                                                         


वृत्ती/प्रवृत्तीवर उपहासगर्भ टिप्पणी हे दादलेवा शेरांचे एक वैशिष्ट्य आहे ते असे.
संस्कृत, मराठीचे मोजके छंद सोडले तर बहुतांश छंद गेय असले तरी कष्टसाध्य आहेत. त्यांत छंदोबद्घ रचना करताना कवींना निश्चितच शब्दांबाबत तडजोड करावी लागे, आशयाला काही अंशी मुरड घालावी लागत असावी. याउलट अनेक अरबी फारसी छंदांत अनन्यसाधारण लयबद्घता असून त्यांत काव्य-सृजन त्यामानाने अधिक सहजपणे करणे शक्य आहे. अर्थात मुक्त वा गद्य काव्य-सुजनापेक्षा, आघातनिष्ठ छंदोबद्घ काव् य-सृजन (तंत्रानुगामी असल्याने) कृतक भासणे स्वाभाविक आहे. इथेच कवी गजलकाराच्या नैपुण्याचा कस लागतो. आपल्याला अभिप्रेत असलेल्या आशयाचे काव्य-सृजन, शब्द आशयाबाबत तडजोड करूनही, तसे भासू न देणे हीच खरी कला आहे. वार्णिक वृत्तांपेक्षा मात्रिक छंदांचा वापर करून हा हेतु साध्य करता येतो. मात्रिक छंदांनी छंदोबद्घ काव्याचे क्षेत्र अत्यंत विस्तारते. तसेच स्वरानुगामी यमकांचा वापर करून गजलेवरील कृत्रिमतेचा आरोप खोडून काढता येतो याचा प्रत्यय डबीरांच्या खालील शेरावरून येईल -

तुला वाटते जगणे म्हणजे गाणे असते
खरे सांगतो जगणे हे तर ओझे असते

इथे काफिये ‘गाणे’, ‘दाणे’, ‘आणे’ न येता ‘गाणे’, , ‘ओझे’, ‘ताजे’, ‘साधे’, ‘कोडे’, ‘जगणे’, इ. आले आहेत. यात ‘ए’, हा स्वर व्यंजनांसह सांभाळला आहे. हा स्वरानुगामी काफिया होय. हा काफियाने अभिव्यक्तीच्या कक्षा वाढतात व एकसुरीपणा कमी होतो.
उच्च श्रेणीची गजल वाचक किंवा श्रोत्यांच्या मन व बुद्घीचा त्वरित ठाव घेते. तिच्या अंतरंगता दर्जेदार कवितेची आशयघनता अन्‌ सुरेल गीताची लय अंगभूत असते. गालिबचे अनेक शेर या निकषांवर पडताळून पाहता, माझे हे विधान अवश्य पटेल. असे सार्वकालीन शेर मोजक्याच मराठी गजलकारांच्या गजलांत आढळतात. त्यात डबीरांच्या शेरांची संख्या लक्षणीय ठरते.

जमेल तितके जगायचे हे ठरले आहे
निरोप येता निघायचे हे ठरले आहे

निर्भीडपणे मरणाला समोर जाण्याचीही तयारी स्थितप्रज्ञ वृत्तीतूनच साकार होऊ शकते कारण तीच व्यक्ती मृत्यू नामक अटळ गोष्टीबाबत अशी त्रयस्थ व शांत स्वीकृती नोंदवू शकते. नियतीचे कार्य कोणी बदलू शकत नाही हे जाणतो, पण एक प्रकारच्या बेदरकार वृत्तीने तोच हे सत्य मांडू शकतो.

आरशातली भ्रामक प्रतिमा खरी समजलो
निर्दय, कपटी दुनियेलाही भली समजलो

पहिल्या मिसर्‍यात अज्ञान दशेतील जगन्मिथ्या वाद मांडला गेला आहे.

चेहरे वाचले, माणसे चाळली
आणि तेव्हा कुठे जिंदगी समजली

हा एक शाश्वत शेर आहे. जीवनाचे आकलन होण्यासाठी जीवनात भेटणारी माणसे समजणे गरजेचे आहे. बाह्य रूपावरून नव्हे तर चेहर्‍यांवरून, त्यातील भाव व भावातून त्यांचे अंतरंग म्हणजे वृत्ती-प्रवृत्ती कळणे गरजेचे आहे. अशा प्रक्रियेनेच जीवन साकल्याने उलगडू शकते.
डबीरांनी अनेक वेधक व अनवट रदीफ (अंत्ययमक) आपल्या गजलांत वापरले आहेत. उदा. घ्गंमत आहेङ, घ्अभिनय केलाङ इत्यादी. अनेक गजलकारांनी तो त्वरित वापरण्याची घाई केली त्यामुळे त्या रदीफमध्ये रचल्या गेलेल्या इतरांच्या गजला म्हणाव्या तेवढ्या चांगल्या उतरल्या नाहीत.
रदीफ व काफिया हे गजलेचे सौंदर्यतत्व आहे. छंदांमुळे उत्पन्न होणार्‍या लयीला पुरक आल्हाददायक गेयवृद्घी रदीफ व काफियांमुळे होते व शेरात नादमाधुर्य अवतरते. यामुळेच शेरातील आशयाची अनुभूती रसिकांना येते. याचा प्रत्यय डबीरांच्या खालील शेरावरूनच सहज येईल -

फुलांनी दृष्ट काढावी असा तो चेहरा आहे
कळ्यांची नजर लागावी असा तो चेहरा आहे

गव्हाळी गौर रंगाला नव्हाळी सोनचाफ्याची
सणाला गौर मांडावी असा तो चेहरा आहे

अनेक कवींची काव्य अभिव्यक्ती फक्त गजलेतच होते हे मला पटत नाही. ही मंडळी काव्यप्रांतात कवी म्हणून स्वत:ला सिद्घ करू शकली नाहीत. पण कार्यशाळेतून बाहेर पडल्यावर त्वरित गजलकार बनली. अल्पावधीत गजलसंग्रह काढून त्यात भटांच्या अभिनिवेषात गजलरचनेचे तंत्र व मंत्रही शिकवू लागली. ज्यांना स्वत:ला मार्गदर्शनाची गरज आहे तेच मार्गदर्शक बनू लागले ह्यासारखा दुसरा विनोद नाही. यामुळेच कदाचित गजल सृजनाचे क्षेत्र खुद्द गजलकारांच्या ऐवजी सुमार दर्जाच्या गायकांच्या हाती गेले. कवितेच्या क्षेत्रात अजूनही ‘कवी’चा दबदबा आहे. ते गायनानुकुल लिहीत असतील; पण अद्याप गजलकारांसारखे गायनानुकूल लिहीत निश्चित नाहीत.
डबीरांनी गजलची विविध रूपे आपल्या समग्र काव्यसंग्रहातून दाखविली आहेत. घ्दंवात न्हाल्या फुलांसारखी दिसायची तीङ, ‘फुलांनी दृष्ट काढावी’ असा तो चेहरा आहे’, अशा श्रृंगारिक गजला तर ‘कोळशाची खाण’, ‘तहलका’, ‘कोण जाणे कोणता हा देश आहे’, अशा राजकीय गजला, ‘एरव्ही जगासवे मी खरेच बोलतो’ आदि मदिरारंगाच्या गजला, ‘काळिजगुंफेमधला वारा’, ‘अंधुक अंधुक कितीक चेहरे’, ‘सांजयात्रेला निघाल्या लांबणार्‍या सावल्या’, अशा ग्रेस शैलीच्या प्रतिकात्मक गजला, याशिवाय अज्ञाताचा शोध घेणार्‍या गजला, ‘माझ्याच सारखा कोणी’, ‘ती नदी न दिसते कोणा’, ‘मी कोण कोठला’ अन्‌ प्रार्थना स्वरूपाच्या ‘भणंग माझे जिणे’, अशा विविध स्वरूपाच्या गजला त्यांच्या संग्रहात आहेत. कदाचित याचं स्पष्टीकरण हे असावं -

धूर येतो कोठुनी हे कळत नाही
कोणती ही आग आहे ? दिसत नाही

ही आग आंतरिक काव्यप्रतिभेची असते, ती सृजनाद्बारे अभिव्यक्त होण्यास अधीर असते, डबीर म्हणतात-

कधी हसते कधी रुसते कधी ती फार छळते रे
कधी कविता, कधी गाणे कधी ती गजल असते रे

कोणतीही कवीची काव्य अभिव्यक्ती केवळ एकाच आकृतिबंधात व्हावी हे मला तरी तितकेसे पटत नाही. डबीर म्हणतात त्याप्रमाणे कविता, गीत, गजल असा विविध पद्यरूपात ती साकारत असते हेच खरे. एका फॉर्ममध्ये आयुष्यभर रचना करणार्‍यांच्या (विशेषत: छंदोबद्घ रचनेबाबत) रचनांवर कृत्रिमतेचा आरोप होण्याचीच शक्यता अधिक असते.
आकृतिबंधाचा विचार करता कवितेपेक्षा गजलची प्रमाणबद्घता अधिक असल्याने तिच्यात सहेतुक पाल्हाळ लावता येत नाही, हीच तिची मर्यादा अन्‌ ताकदही आहे. मोजूनमापून, अचूक शब्दयोजना करणे गरजेचे असते. याने गजल लालित्यपूर्ण होण्यास मदत होते. या संदर्भात डबीरांचे दोन शेर बघा -

काहीही कारण नसता, मी उगाच हसतो आहे
दुनियेत शहाण्यांच्या मी, वेडेपण जपतो आहे
---
तू मनाचा कोष विणूनी भोवती अंधार केला
मृगजळास्तव धावण्याचा का असा अविचार केला?

मराठी काव्यसमीक्षकांनी मराठी गजलची हवी तेवढी दखल घेतली नाही याची खंत करीत गजलकार, त्यांना गजल कळत नाही असा तर्क देतात. पण हे बरोबर नाही. भटांच्या प्रतिभेपर्यंत पोहोचणारी गजल अद्याप तरी मराठी गजलकार देऊ शकले नाहीत. विषयवैचित्र्याच्या दृष्टीने मराठी गजलने बरीच प्रगती केली. पण उर्दूच्या तुलनेत तिच्यात अजूनही एक प्रकारचा शुष्कपणा जाणवतो अन्‌ काफियांच्या मर्यादांमुळे एकसुरीपणा आढळतो. कार्यशालेयनिर्मित गजलकार काफियाच्या अंगाने म्हणजे यमके काढून गजलरचना करतात. छंदोबद्घ रचनेत एका मर्यादेनंतर ‘क्राफ्टमनशिप’करावीच लागते हे मान्य करूनही काफिया काढून गजलरचना करणे ही बाब त्याही पलीकडची वाटते. कदाचित विषयवैचित्र्यांच्या शेरांमुळे समीक्षकांना रसानुभवात व्यत्यय जाणवत असावा. काव्याचा आस्वाद घेताना विषयांचे मार्गांतरण त्यांना ग्राह्य होत नसावे.
भटांच्या अनेक गाजलेल्या गजला क्रमबद्घ (म्हणजे मुसलसल-एकाच भाववृत्ती व विषयावरील) गजला आहेत. डबीरांच्याही बहुतांश गजला क्रमबद्घ आहेत. ‘फुलांनी दृष्ट काढावी’, ‘एक म्हातारा हरवला’, ‘सांजवेळी’, ‘गाव सोडुनी निघताना’, ‘माझ्यासारखा कोणी’, या शीर्षकांच्या गजला या संदर्भात नमूद करता येतील. उर्दूत क्रमबद्घ गजलांना गजलनुमा नज्म म्हणजे गजलसदृश कविताही म्हणण्याचा प्रघात आहे. पण या गजलांतील शेर एकसंध प्रभाव देत असूनही प्रत्येक शेरात एक परिपूर्ण कविता विद्यमान असल्यास ती गजलच म्हणणे संयुक्तिक ठरते. चांगल्या गजलेतील शेरात विलगता असून एक अदृश्य अशी आंतरिक सलगता असते. याचा प्रत्यय डबीरांच्या उपरोक्त नमूद गजला वाचल्यावर येतो.
गजल कार्यशाळांमुळे मराठीत काफियानुगामी, सांकेतिक आणि कृतक गजलांचे एक आवर्त आले आहे. डबीरांची गजल त्या आर्वताला छेद देऊन तरल, काव्यमय, मुसलसल बाज घेऊन आली आहे. गजल रसिकांप्रमाणे, ती, कवितेच्या जाणकार, संवेदनशील वाचकालाही आकृष्ट करेल असे वाटते.
‘काळिजगुंफा’ हा संग्रह ‘ग्रंथाली’ ने अत्यंत आकर्षक पद्घतीने पेश केला आहे. त्यासाठी ग्रंथालीचे अभिनंदन. ‘काळिजगुंफा’, या संग्रहाद्बारे डबीर गजलांची एक वेगळी तरल शैली रुजवू पाहत आहेत; ती भौतिकतेतून दार्शनिकतेकडे झेपावत आहे. कविता आणि गजलमधली सीमारेषा आधुनिक उर्दू गजलमध्येही पुसट होत असताना, डबीरही म्हणताहेत -

‘गगनधरेची सीमारेषा पुसून गेली
कवेत आले गगनच अवघे विशाल आता’

(‘काळिजगुंफा’, सदानंद डबीर, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई पृष्ठे 72, किंमत 75 रूपये)
________________________________________________________
डॉ. राम पंडित, 4, अटलांटा सोसायटी, फ्लॅट नं. 29, सेक्टर 40, सी-वूडस्‌ दाराव्हे (प.), नवी मुंबई - 400706 दूरध्वनी : 022-27723756]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा